3 जून 2006… मुंबई लगत असलेल्या कळंबोलीत रस्ते जवळपास ओस… आणि सगळं काही नेहमीसारखं शांत. पण ही शांतता काही क्षणांचीच ठरणार होती, याची कुणालाही कल्पना नव्हती. एक गाडी हळूच पुढे सरकत होती… आत होते प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे विश्वासू चालक समद काझी. अचानक— दोन सावल्या पुढे आल्या. क्षणात बंदुका उचलल्या गेल्या… आणि ट्रिगर दाबला गेला! धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या. पहिली गोळी—थेट पवनराजेंच्या डोक्यात. दुसरी—खात्री करण्यासाठी. काही क्षणांतच गाडीत रक्ताचा सडा पडला… आणि पवनराजे खाली कोसळले. पण हल्लेखोर इथे थांबले नाहीत. समद काझी ज्यांनी कदाचित सर्व काही पाहिलं होतं. त्यांनाही लक्ष्य करण्यात आलं. एक गोळी आरपार… आणि काही सेकंदांतच दोघांचाही शेवट झाला. यापाठीमध्ये उद्देश फक्त एकच होता कोणताही साक्षीदार जिवंत राहू नये.
ही घटना केवळ क्षणिक हल्ला नव्हती, तर दीर्घकाळ नियोजन करून राबवलेला कट असल्याचे तपासातून उघड झाले. फेब्रुवारी 2005 पासूनच या हत्येचा कट रचण्यात आला होता. लातूर येथे जाऊन पवनराजे यांच्या घराची रेकी करण्यात आली, त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली आणि योग्य संधीची वाट पाहत तब्बल 16 महिने हा कट सुरू ठेवण्यात आला. कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणाला तब्बल 20 वर्षे उलटली असून राज्यासह देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार,पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.
कै पवनराजे यांची हत्या ज्या शस्त्रानी केली होती ती शस्त्र परदेशी बनावटीची होती त्या बंदुकीवर मेड इन युएसए, चायना असे लिहले होते. पवनराजे यांची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन हल्लेखोर असलेल्या 2 शूटरनी समद काझी यांना सुद्धा एक गोळी मारली, गोळी आरपार गेल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यु झाला. पवनराजे यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्यात लागली तर काझी यांच्यावर एक गोळी झाडली.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.
एकामागून एक असे 3 खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पारसमल जैन याने मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दिली, त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 सीबीआयला पत्र दिले. डॉ पाटील यांच्या वतीने काही शब्द व आश्वासन देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला व खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा केला. मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुdक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपवून ठेवणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने कोर्टात केले, त्यावर कोर्ट काय म्हणते याकडे लक्ष लागले आहे.
सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे तर डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, ऍड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने ऍड नेहा सुळे बाजु मांडत आहेत. प्रकरणातील पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याच्या जबाबाभोवती संपूर्ण खटला फिरत आहे. जैन यांनी सीबीआयला पत्र देत हत्याकांडाबाबत माहिती दिल्यानंतर तपासाला गती मिळाली होती. मात्र, त्यांनी तपास यंत्रणांवर अवैध कोठडी, जबरदस्तीने कबुली घेणे आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे आरोपही न्यायालयात केले आहेत.
बचाव पक्षाकडून सुमारे 1250 पानांचे लेखी म्हणणे सादर करण्यात आले असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून 14 मे रोजी न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार आहे.









