तुळजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या पदग्रहणानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आपल्या खास आक्रमक शैलीत बोलताना त्यांनी, “दिल्लीमध्ये काय काम केले आहे, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. पुढच्या ५० पिढ्या जनतेसाठी आम्ही इथे उभे राहणार आहोत,” असा ठाम दावा मल्हार पाटील यांनी केला.
मल्हार पाटील म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर मिळालेल्या विजयाचा खासदारांना अतिशय आनंद झाला होता. मात्र आता त्याच जनतेने त्यांची खरी ताकद दाखवून दिली आहे. “धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जिंकून दाखवा, नाहीतर मी मल्हार पाटील नाव बदलतो,” असे खुले आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नकारात्मक राजकारण टाळण्याचे आवाहन करत, जनतेसाठी सकारात्मक काम करणे हाच आपला खरा अजेंडा असल्याचे सांगितले. तुळजाभवानी मातेच्या बदनामीचा मुद्दा करून विरोधकांनी अपप्रचार केला, मात्र देवीच्या आशीर्वादाने तो पूर्णपणे फोल ठरल्याचे मल्हार पाटील यांनी नमूद केले.
“आपली टीम शहर, तालुका आणि जिल्हास्तरावर एकजुटीने काम करते. सुख-दुःखात धावून जाणारी ही टीम विरोधकांकडे नाही. त्यांचे उमेदवार निवडणुकीनंतर गायब झाले आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली. पुढील अनेक पिढ्यांसाठी जनतेच्या सेवेत राहण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
तुळजाभवानी मातेची व तुळजापूरच्या नागरिकांची सेवा करणे हे भाग्य असल्याचे सांगत, २०१९ पासून आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे कार्य करत असल्याचा अभिमान असल्याचे मल्हार पाटील म्हणाले. तुळजापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आतापर्यंत १ हजार ८६४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विनोद पिटू गंगणे यांच्यावर वडिलांचे विशेष प्रेम होते, त्यामुळे ते कधीही साथ सोडणार नाहीत, हे विरोधकांना माहिती होते. त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले, मात्र तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले, असेही मल्हार पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पुढे बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, शेमडं पोरं .. तुझी औकात काय ? दिल्लीत काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे. जनतेसाठी पुढच्या 50 पिढ्या आम्ही असणार आहोत असे म्हणत मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला.











